महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात विविध क्षेत्रात काम करुन नावलौकीक मिळविणाऱ्या समाजातील विविध घटकातील महिलांच्या ‘यशोगाथा’ सांगणाऱ्या मुलाखती सुरु आहे. एकीकडे नवरात्रोत्सवात नवदुर्गांचा सन्मान होत असताना दुसरीकडे समाजातील यशस्वी महिलांच्या कर्तृत्व भरारीचा हा आलेख इतर महिलांसाठी अनुकरणीय लौकिकास्पद ठरत आहे.

डॉ. जयश्री थोरात यांनी तळागाळातील महिला व मुलींच्या उन्नतीसाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकविरा फाउंडेशनची स्थापना केली असून या फाउंडेशनच्यावतीने तालुक्यात अनेक संकल्पना राबवल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजातील महिलांना व मुलींना विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण,अध्यात्म व राजकारण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांनी केलेले कार्य व त्यांचे अनुभव समाजातील इतर महिलांसाठी प्रेरक ठराव्यात याकरीता या महिलांच्या संवादात्मक मुलाखती सुरु आहेत.
एकविराच्या माध्यमातून सुरु असलेल्या या कार्यक्रमामधून आत्तापर्यत संगमनेरातील गायिका निलांबरी कोर्टीकर यांच्या यशाचा आलेख उलगडत त्यांनी स्वतःचे अनुभव व प्रसिद्ध गायक होण्यासाठी काय करावे याची माहिती दिली. प्रसिद्ध कीर्तनकार सुनीता कातोरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी कीर्तनकार होण्यासाठी काय करावे याविषयी आपल्या मुलाखतीत सांगितले. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या व सायकलवर महाराष्ट्र भ्रमंती करणाऱ्या प्रणाली चिपटे यांनी आपल्या महाराष्ट्रातील प्रवासाविषयी अनुभव महिलांशी शेअर केले. योगाविषयी समाजातील महिला व मुलींना माहिती व्हावी यासाठी लहान वयात योगामध्ये पारंगत असलेल्या अशा रुणझुण फटांगरे या मुलीने योगा व योगामुळे आपल्या आरोग्यास काय फायदा होतो हे सांगितले.
फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा महिलांनी व मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.



