महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मालमत्ता धारकांकडून बेकायदेशिरपणे संगमनेर नगरपालिका आकारत असलेल्या शास्तीचा विषय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आता नव्या सरकारच्या नगरविकास मंत्रालयात चर्चीला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार आणि माजी नगरसेवक शिरीष मुळे यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर नगरपरिषदेकडून बेकायदेशिरपणे अनधिकृत बांधकामावरील शास्ती व त्यावर चालु आर्थिक वर्षात लावण्यात येणारी प्रतिमहिना २ टक्के शास्तीचा विषय त्यांच्यासमोर मांडला.
यासंदर्भात विखे पाटील यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. संबधीत विषय नगरविकास मंत्रालयाशी संबधीत असल्याने नगरविकास मंत्रालयासोबत बैठक घडवून आणण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासंदर्भात कोणती भूमिका घेतात. पालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या शास्तीतून संगमनेरकरांची सुटका होणार का? विरोधी भाजपच्या नेत्यांना हा प्रश्न सोडविण्यात यश आल्यास याचा फायदा निश्चितच संगमनेरकर नागरिकांना आणि पर्यायाने पालिका निवडणूकीत भाजपला होण्याची चिन्हे आहे.


