महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
गेल्या वर्षी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करून चर्चेत आलेले आणि सत्तांतर झाल्यानंतर फारसे चर्चेत नसलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपादक असलेल्या दैनिक ‘सामना’वर बंदीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. अनेक दिवस अटकेत असलेल्या सदावर्ते यांनी नंतरच्या काळात मवाळ भूमिका घेतली.
महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले त्यानंतर देखील जवळपास तीन महिने सदावर्ते शांत होते.
अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारने क्लीनचीट दिलेल्या व आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्याबद्दल दैनिक सामनातून येत असलेल्या बातम्यांचे कारण पुढे करत या बातम्यांच्या माध्यमातून त्यांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’वर बंदीची मागणी केली.
या संदर्भात रजिस्टर ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया (RNI) आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करत असल्याचे म्हटले आहे तसेच राज्याच्या गृह खात्यानेही याबाबत दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची ओळख असलेले ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठविले होते. त्या पाठोपाठ आता दैनिक ‘सामना’वर बंदीची मागणी करण्यात आल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामागील शुक्लकाष्ट अद्यापही सुरू असल्याचे दिसते.


