महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागतात मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमध्ये धक्कादायक निर्णयांना सुरुवात केली आहे. पदभार हाती घेताच त्यांनी काँग्रेसचा आत्मा समजली जाणारी काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) बरखास्त करीत नवी सुकाणू समिती जाहीर केली.
काँग्रेसच्या नव्या सुकाणू समितीत अनेक बड्या नेत्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे दिसते. नव्या वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता काँग्रेसमध्ये आहे.
या समितीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्थान देण्यात आले आहे. जोपर्यंत काँग्रेसची नवी कार्यकारिणी स्थापन होत नाही तोपर्यंत पक्षाचे कामकाज या सुकाणू समितीच्या माध्यमातून चालणार आहे.
नवीन समिती सहजपणे स्थापन करता यावी यासाठी बुधवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. पक्षांतर्गत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार काँग्रेस वर्कींग कमिटीला (CWC) आहेत मात्र जोपर्यंत ती स्थापन होत नाही, तोपर्यंत सर्व निर्णय या सुकाणू समितीच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत.
नव्या काँग्रेस वर्किंग कमिटीची (CWC) ची घोषणा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये केली जाणार असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार १२ सदस्य नामनिर्देशित केले जातात आणि ११ सदस्य निवडले जातात. ही समिती जाहीर होईपर्यंत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या सहीने नव्या ४७ सदस्यांच्या सुकाणू समितीची घोषणा करण्यात आली आहे.
नव्या समितीमध्ये
माजी अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए. के. अँटनी, अभिषेक मनू सिंघवी, अजय माकन, अंबिका सोनी, आनंद शर्मा, अविनाश पांडे, गायखंगम, हरीश रावत, जयराम रमेश, जितेंद्र सिंग, कुमारी सेलजा, के. सी. वेणुगोपाल, लालथनहवला, मुकुल वासनिक, ओमन चंडी, प्रियांका गांधी, पी. चिदंबरम, रणदीपसिंग सुरजेवाला, रघुबीर मीना, तारिक अन्वर, ए. चेल्ला कुमार, अजय कुमार, अधीर रंजन चौधरी, भक्त चरणदास, देवेंद्र यादव, दिग्विजय सिंग, दिनेश गुंडू राव, हरीश चौधरी, एच. के पाटील, जय प्रकाश अग्रवाल, के. एच. मुनियप्पा, बी. मणिकम टागोर, मनीष चतरथ, मीरा कुमार, पी. एल. पुनिया, पवनकुमार बन्सल, प्रमोद तिवारी, रजनी पाटील, रघु शर्मा, राजीव शुक्ला, सलमान खुर्शीद, शक्तीसिंह गोहिल, टी. सुब्बीरामी रेड्डी आणि तारिक हमीद शामली यांचा समावेश आहे.
नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले शशी थरूर, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या बड्या नेत्यांना डावण्यात आले आहे.
विशेष म्हणजे याच नेत्यांनी खासदार सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाची मागणी केली होती.

