महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय, पण यापुढे कोणीही असला तरी प्रहारचा वार काय आहे हे दाखवून देऊ. सत्ता गेली चुलीत. अशा थेट शब्दात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.
50 खोक्यांच्या आरोपावरून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आमदार कडू यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अमरावतीमध्ये आज भूमिका जाहीर केली. आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना आमदार कडू यांनी शिंदे फडणवीस सरकारलाही निर्वाणीचा इशारा दिला. 
मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार बच्चू कडू म्हणाले, सत्ता गेली चुलीत गेल्या वीस वर्षांपासून साडेतीनशे गुन्हे अंगावर घेऊन महाराष्ट्रात फिरतोय. बाकीचे नेते कार्यकर्त्यांना लढायला सांगतात मात्र हा बच्चू कडू स्वतः लढतोय. हा फरक माझ्यात आणि अन्य नेत्यांमध्ये आहे. कोणीही येऊन काहीही बोलावं हे यापुढे चालणार नाही. पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो. मात्र प्रहारच्या वाटेत कोणी आल्यास त्याला प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ.
राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करावा लागेल. आणि तत्व तत्त्वाच्या पद्धतीनेच पाळावे लागतील. फक्त तत्त्व धरून बसलो आणि इकडे काहीच ताकद लावली नाही तर त्या तत्त्वालाही किंमत राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा तह केले पण तत्वांचे तडजोड केली नाही अशा शब्दात त्यांनी आपले बंडा मागील भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली.
गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्राचा काना कोपरा पिंजून काढला आहे. आम्ही सत्तेला पाठिंबा दिला तर आमच्यावर खोक्यांचा आरोप झाला. मात्र ज्याने कोणी आरोप केला तो विषय सध्या संपला असल्याचे सांगत त्यांनी आमदार रवी रानांसोबत असलेल्या वादावर पडदा टाकला.
आज केवळ दोन आमदार स्टेजवर आहेत मात्र भविष्यात प्रहारचे दहा आमदार स्टेजवर असतील. पुढील काळात प्रहार संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात असेल असे देखील आमदार कडू यांनी स्पष्ट केले.


