महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत लढणार असल्याने आरपीआयला सत्तेत चांगला वाटा मिळायला हवा. यासाठी राज्यपाल नियुक्त बारापैकी एक जागा आरपीआयला देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात त्यांच्यात यावेळी चर्चा झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) भाजपसोबत ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2012 पासून आरपीआय भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही तुम्हाला सत्तेमध्ये नक्कीच चांगला वाटा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
आरपीआयची सर्व ताकद भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याने आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहोत असे आठवले यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले.



