महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संस्थेच्या इमारतीच्या वॉटर प्रूफिंग आणि कोबा करण्याच्या नियोजित कामात ठेकेदाराकडून तीस हजार रुपयांचे लाच घेताना आयटीआयच्या प्राचार्याला नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलगदपणे सापळ्यात पकडले आहे.
नासिकरोड पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेला निलेश बबन ठाकूर हा सिन्नरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) प्राचार्य आणि सचिव आहे.
एसीबीच्या माहितीनुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे वॉटरप्रूफिंग आणि कोबा करण्याचे काम नियोजित होते. ११ लाख ५१ हजार रुपयांना या कामाचा ठेका एका कंत्राटदाराला देण्यात आला होता.
या कंत्राटदाराकडे प्राचार्य ठाकूर याने तीन टक्के रक्कम लाच म्हणून देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम 30 हजार रुपये निश्चित झाली. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने नाशिकच्या एसीबीसी संपर्क करत तक्रार केली होती.
नासिक रोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
या ठिकाणी पैसे घेण्यासाठी आलेल्या ठाकूर याला कंत्राटदाराकडून तीस हजार रुपयांचे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.


