महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री तेलंगणामधून महाराष्ट्रामध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात देगलूर मध्ये आली असताना या यात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. स्वागता दरम्यान यात्रेला महाराष्ट्रात देखील इतर राज्याप्रमाणे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
खासदार गांधी गुरुनानक जयंतीच्या पूर्वसंध्येला यादगार साहिबजादे बाबा जोरावर सिंहजी फतेहसिंहजी गुरुद्वारामध्ये पारंपारिक शिखांच्या वेशात पोहोचले. तेथे त्यांनी गुरुनानकांसमोर सौहार्द आणि समानतेसाठी प्रार्थना केली. त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
देगलूर मध्ये मोठा उत्साह आणि वातावरण काँग्रेसमय
‘नफरत छोडो भारत जोडो’चा संदेश देणारी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रमध्ये सोमवारी रात्री दाखल झाली. रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेसचे चिन्ह असलेल्या तिरंगी पताका, तिरंगी झेंडे झळकत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात तिरंगी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. देगलूरच्या शिवाजी महाराज चौकातील वातावरण काँग्रेस आणि तिरंगामय झाले होते. यात्रेच्या स्वागतासाठी लहान मुले महिला तरुण वयोवृद्ध नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तर यात्रेच्या मार्गात लागलेल्या स्वागत फलकांवर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस नेते आणि भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमा दिसून येत होत्या.

