महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून नांदेडमध्ये असून गुरुवारी रात्री यात्रेत सहभागी झालेल्या दोघा यात्रेकरूंना ट्रकने उडविण्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत.
भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये असून या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या यात्रेतून एक दुःखद घटना समोर आली. नवीन मोंढा परिसरातील सभा संपल्यानंतर यात्रा महादेव पिंपळगाव येथील कॅम्प कडे रवाना झाली. रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव येथील नांदेड अकोला पाळी चालणाऱ्या गणेशन (वय ६२वर्ष) आणि सययुल (वय ३० वर्ष) या दोघांना ट्रकने धडक दिली.
गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गणेशन याचा मृत्यू झाला तर सययुल याच्यावर उपचार सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळतात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत चव्हाण रुग्णालयात थांबून रुग्णास मदत करत होते.
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस सेवादलाचे महासचिव कृष्णकांत पांडे यांचे निधन झाले. त्या पाठोपाठ राज्यातील ही दुसरी दुःखद घटना आहे.

