महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
हे कायद्याचे राज्य आहे. सरकार नियमानुसार चालते. लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाऊ शकते. परंतु कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड विनयभंग प्रकरणावर दिला आहे.
आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नासिक-मुंबई महामार्गावर जाळपोळ करण्यात आली, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसांवर नाही. तसा दबाव टाकला ही जाणार नाही. पोलीस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी करतील. तपास करतील, पडताळणी करतील. जी काही तक्रार असेल त्यात तर त्या असेल किंवा नसेल, त्याप्रमाणे पोलीस त्यांची कार्यवाही करतील.
आमच्या सरकारने राजकीय सुड भावनेपोटी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि करणार देखील नाही. दरम्यान राजकीय षडयंत्र रचले गेले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, कोणी षडयंत्र रचले ते त्यांनाच विचारा. जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. लोकप्रतिनिधी आहेत. ठाण्यातील कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो. मात्र पुन्हा सांगतो की, तक्रारीत काय तथ्य असेल किंवा नसेल त्या अनुषंगाने पोलीस त्यांची कार्यवाही करतील.

