महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अनाथ युवतीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर आणखी एकाला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची अधिक चौकशी करीत आहेत.
अनाथालयात राहत असलेली ही युवती रागाच्या भरात निघून गेली होती. त्यानंतर तिच्यावर शिर्डीत पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचं समोर आलं. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष घालत शिर्डीत भेट देत तपासासाठी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पोलीस तपासाला गती आली.
या युवतीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाथ युवतीवरील सामूहिक अत्याचारप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. याप्रकरणी आणखी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
तपासावर पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अजित पाटील हे स्वतः लक्ष ठेवून आले. उपनिरीक्षक दीपक पाठक या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

