महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : सासू आणि नवऱ्याच्या छळाला कंटाळात संगमनेर तालुक्यातील खांबे येथील एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती आणि सासूच्या विरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
काजल मच्छिंद्र वाघ असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून तिचा विवाह संगमनेर तालुक्यातील खांबे येथील मच्छिंद्र बाळासाहेब वाघ यांच्याबरोबर 13 मार्च 2018 रोजी झाला होता. विवाह नंतरचे सुरुवातीचे चार-पाच महिने उभयंतांचा संसार चांगल्या पद्धतीने सुरू होता. नंतर मात्र त्यांच्यात कौटुंबिक कलह सुरू झाले. लग्न संबंधातून या दांपत्याला मुलगी झाली.
मुलगी झाली म्हणून त्यांच्यातील वादात आणखी भर पडली. माहेरून पैसे आणावेत यासाठी पती मच्छिंद्र वाघ आणि सासू कुसुम वाघ यांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करत तिला मारहाण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पती व सासूच्या छळाला कंटाळून विवाहित काजल हिने खांबे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात बाळासाहेब दामोदर गरगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती मच्छिंद्र वाघ आणि सासू कुसुम वाघ या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच शाळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून विवाहितेचा पती मच्छिंद्र वाघ याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.

