महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या माथी दरवाढ लादण्याचा प्रयत्न चालविला आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणात ग्राहकांना वीज वापराबद्दल भुर्दंड बसेल. याचा विरोध करण्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी संभाव्य वीज दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवत हरकत नोंदवण्याचे आवाहन शिर्डी काँग्रेसचे नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी केले आहे.
संभाव्य दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत वीज ग्राहकांकडून हरकती मागविल्या आहेत. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना पगारे म्हणाले, सध्या विजेचा दर प्रति युनिट ३.३६ रुपये असून येत्या दोन वर्षात तो ४.५० ते ५.१० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सदर दरवाढ झाल्यास याचा वीज ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत या विरोधातील आक्षेप, हरकती नोंदविणे आवश्यक आहे. या संदर्भातील अर्जाचा नमुना उपलब्ध असून वीज ग्राहकांनी तो भरून अधीक्षक अभियंता, प्लॉट नंबर – जी ९५, प्रकाश गड, प्रो. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई पिन ४०००५१ या पत्त्यावर टपालाने पाठविणे आवश्यक आहे किंवा suggestions.२०२२mahadiscomin येथे ईमेलद्वारे पाठविण्याचे आवाहन पगारे यांनी केले आहे.
मामा पगारे म्हणाले, विज ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीची भावना असुन परराज्यात वीज स्वस्त असताना देखील महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय का? असा सवाल विचारला जात आहे. विजेची चोरी रोखण्यासाठी विज मंडळाला अपयश आलेले आहे. असे असताना राज्यातील वीज ग्राहकांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. वीज कंपनीला विजगळती, महावितरणमधील भ्रष्टाचार रोखण्यात अपयश आल्याने महावितरणने आपले नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महावितरण चा वीज दरवाढीचा हा प्रस्ताव म्हणजे महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय असल्याचे ते म्हणाले.

