महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले बाळासाहेब थोरात हे लोकनेते असून संगमनेर तालुका व नगर जिल्ह्यासाठी ते केवळ नेते नव्हे तर आपला स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यातील वेल्हाळे येथे हरीबाबा मित्र मंडळाच्या वतीने कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुखयांच्या कीर्तनाने मंगळवारी या सप्ताहाची सांगता झाली.
यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी केक कापून आमदार थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले, जीवनामध्ये व्यक्तीने अंधश्रद्धेला थारा न देता शुद्ध आहार, शुद्ध आचार ठेवण्याची गरज आहे. देव पण येण्यासाठी फार कष्ट सोसावे लागतात. सध्या फॅशनच्या नावावर चाललेले संस्कृतीचे विद्रूपीकरण अत्यंत दुर्दैवी आहे. वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण व अपघाताचे प्रमाण ही मोठी चिंताजनक बाब असून चांगला आहार असेल तर माणूस निरोगी राहतो.
याकरिता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आहारात जास्त घेतल्या पाहिजे. याचबरोबर अपघात टाळण्यासाठी व्यसन करू नये, त्याचबरोबर वेगाची मर्यादा राखावी आणि सर्वात महत्त्वाचे मोबाईलवर बोलणेही टाळले पाहिजे. यावेळी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या विविध बाबी लक्षात आणून देत चांगल्या सवयी, चांगली संस्कृती, चांगला आहार यावर त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी संगमनेरचे नाव राज्य पातळीवर नेले आहे.
याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख यांनीही मनोगते व्यक्त केली. सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी वेल्हाळे, मालदाड, घुलेवाडी यांसह परिसरातील भावीक भक्तगण दररोज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

