महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेरच्या मालपाणी परिवाने गेली कित्येक वर्ष यशस्वी उद्योगासह लोकहिताचे विविध उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासली आहे. आपल्या औद्योगिक विस्ताराच्या माध्यमातून हजारों परिवारांना रोजगार मिळवून दिला आहे. औद्योगिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या व्यापक विस्तारातून पदोपदी प्रभू श्रीरामाच्या कार्याचे दर्शन घडते, असे गौरवोद्गार विश्वविख्यात रामकथा मर्मज्ञ, युगवक्ता डॉ. कुमार विश्वास यांनी काढले.
उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मालपाणी परिवाराने त्यांच्या दोन दिवशीय रामकथेचे संगमनेरात आयोजन केले आहे. या कार्यक्रमा वेळी विश्वास बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी सभापती, आमदार दिलीप वळसे पाटील, माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, भाजपचे नेते श्याम जाजू, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह राजेश, डॉ. संजय, मनिष, गिरीश व आशिष मालपाणी आदी उपस्थित होते.
डॉ. विश्वास यांनी आपली ओघवती वाणी आणि रसाळ शैलीने उपस्थित श्रोत्यांना रामरसाने मंत्रमुग्ध केले. रामकथेचे वर्णन करतांना प्रसंगानुरुप सादर केलेल्या त्यांच्या कविता आणि गीतांनी प्रेक्षकांनाही रामनामात डोलायला लावले. प्रभु रामचंद्रांच्या जीवन चरित्राला मानवी जीवनाशी जोडतांना त्यांनी दिलेले विविध दाखले, कविता, संकिर्तन, मार्मिक टिप्पणी आणि विनोदांनी जवळपास दोनतास चाललेल्या या कथारसात रंगत भरली.
अध्यात्म ही म्हातारपणाची गोष्ट नसल्याचे सांगत त्यांनी तारुण्यावस्थेतच त्याची वाट धरण्याची अपेक्षा व्यक्त केली. अध्यात्माने आपल्याला दिलेल्या तत्त्वांवरुन केलेला प्रवास यशाचा दिशेने जाणारा आहे. जीवनाच्या अखेरच्या काळात वेळ घालवण्यासाठी अध्यात्माची वाट धरणं चुकीचे असल्याचे सांगतांना त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांमधील सत्तर टक्के उपस्थिती तरुणांची असल्याचे समाधानही व्यक्त केले.
धार्मिक कट्टरवादापेक्षा अध्यात्मिक विचारधारा केव्हाही सर्वश्रेष्ठ आहे. कट्टरतावादातून भेदभाव आणि हिंसाचार निर्माण होतो तर, अध्यात्मिक मार्ग वैश्विक प्रेम आणि चेतना निर्माण करते. कोरोना महामारीने जगातील अनेक देशांचे गर्वहरण केल्याचे सांगतांना त्यांनी या काळात हजारों किलोमीटरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित करणार्या देशांचे दाखलेही दिले. या जागतिक अपयशानंतर आता त्यावर आत्मचिंतन केले जात असल्याची पृष्टीही त्यांनी जोडली. सध्या जगभरात नैराश्यग्रस्तांची संख्या वाढत असल्याकडे लक्ष वेधतांना त्यांनी अशावेळी रामचरित मानस आणि भगवद्गीतेचे वाचन करण्याची गरज व्यक्त केली. श्रीरामांच्या कथेतून सत्यवचन, धैर्य, शौर्य, त्याग, सज्जन संघटन व दृष्टांचे निर्दालन ही शिकवण मिळते. त्याचे आपल्या जीवनात अनुकरण करण्याचा सल्लाही त्यांनी श्रोत्यांना दिला.
तत्पूर्वी डॉ.विश्वास यांच्यासह माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजीमंत्री बाळासाहेब थोरात व भारतीय जनता पक्षाचे नेते श्याम जाजू यांच्या हस्ते उद्योगपती राजेश मालपाणी यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. राजेश मालपाणी यांच्या औद्योगिक जीवनाचे विविध पैलु उलगडणार्या डॉ. संतोष खेडलेकर लिखित ‘ओपन सिक्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील व श्याम जाजू यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मालपाणी परिवाराच्या प्रदीर्घ सामाजिक व औद्योगिक प्रवासातील आपापल्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी रुजविलेला सामाजिक कार्याचा वारसा राजेश मालपाणी यांच्यासह त्यांच्या चारही भावंडांनी अव्याहतपणे पुढे सुरु ठेवल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले. राजेश मालपाणी यांच्या दूरदृष्टीतून संगमनेरसारख्या छोट्या शहरातील या उद्योगाने देशभरात विस्तार केल्याबद्दल मालपाणी परिवाराबाबत प्रशंसोद्गारही व्यक्त केले. डॉ. संजय मालपाणी यांनी कार्यक्रमाचे निवेदन तर मनिष मालपाणी यांनी आभार मानले.
सोमवारी या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या समारोप प्रसंगी रामायणातील विविध प्रसंगांना दोन-अडिच तासांच्या नाट्यमालेत गुंफून ध्रुव ग्लोबल स्कूलचे तिनशे विद्यार्थी ‘रामायण महानाट्य’ सादर करणार आहेत. प्रसंगानुरुप बदलणारा मंच, नेमक्या ध्वनी व प्रकाश योजनेचा वापर, प्रभावी संवाद आणि प्रसंगानुसार अवतरणारी भव्यता यातून हे महानाट्य प्रभु रामचंद्रांच्या जीवन चरित्राचे दर्शन घडवणारे ठरणार आहे. संगमनेरकरांनी या संधीचा लाभ ध्यावा असे आवाहन मालपाणी परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

