महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ठरलेल्या सांस्कृतिक मेधा २०२३ महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा कलाकार श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या समवेत अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात धमाल केली.
संगमनेरमधील अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या मेधा मैदानावर सुरू असलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमावेळी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. हसमुख जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधा समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बाबासाहेब लोंढे, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी. शेट्टी, शितल गायकवाड, अंजली कन्नावार, प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे, नामदेव गायकवाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत भूमीचा गौरव करणारी नाटिका सादर झाली. यानंतर भांगडा, बिहू नृत्य, संबळ नृत्य, गोंधळ याचबरोबर लहान मुलांच्या पारंपारिक वेशातील फॅशन शो ने धमाल केली. इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हॉरर शो ने अंगावर शहारे आणले. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती काळाचे वर्णन करणाऱ्या पोवाड्याचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. रामायण महाभारतातील कथासह वेशभूषा हे आकर्षण ठरले.
याचबरोबर डी फार्मसी व बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फ्युजन डान्सला टाळ्यांचा कडकडून प्रतिसाद मिळाला. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठी गीतांवरील सामूहिक नृत्यांनी सर्वांना ठेका धरायला लावला. इंजिनिअरिंग कॉलेजच्या फ्युजन सॉंगवर सिने अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनीदेखील ठेका धरला.
शरयू देशमुख म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १९८३ मध्ये स्थापन केलेली अमृतवाहिनी संस्था ही वटवृक्ष झाली आहे. संस्थेच्या विविध विभागांना राष्ट्रीय मानांकाने मिळाले असून गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ही महत्त्वाची बाजू आहे. त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी २०१६ पासून मेधा महोत्सव सुरू करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक जी. बी. काळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी आभार मानले.
यावेळी श्रेयस तळपदे म्हणाले…
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृतवाहिनी संस्था ही गुणवत्तेमुळे महाराष्ट्रात पोहोचली आहे. गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकासासाठी मेधा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जीवनात अभ्यास महत्त्वाचा आहेच पण त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी तुमच्यातील गुण विकसित झाले पाहिजे. आणि सर्वांगीण विद्यार्थी घडवण्याचे काम अमृतवाहिनीत होत आहे. हा परिसर आणि येथील वातावरण हे मनाला भारावून टाकणारे असल्याचेही ते म्हणाले.प्रार्थना बेहेरे म्हणाल्या…
संगमनेर हे मोठे शैक्षणिक केंद्र झाले आहे. मी ही करिअरच्या सुरुवातीला लहान कार्यक्रमांमधून सुरुवात केली. ग्रामीण भागात खरे कलाकार असून त्यांना संधी मिळाली तर ते नक्कीच आपले नाव उज्वल करतील. मला किंवा मुंबईच्या मुलींना अमृतवाहिनीसारख्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायला नक्की आवडेल.

