महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव जिल्ह्याला देणे भूषणावह आहे. त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. याबाबत निर्णय झाला तर, निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करू. अशा शब्दात राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरच्या नामांतरास अनुकूलता दर्शविली आहे. संभाजीनगर आणि धाराशिव या नावांना अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानताना अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करणार असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या नावांना केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबतची मागणी केल्यानंतर महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी अशी लोकांची मागणी नसल्याचे सांगत नामांतरापेक्षा अन्य प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांनी आता या संदर्भात यु टर्न घेत अहिल्यादेवींच्या नावाचे स्वागत करणार असल्याचे म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या नावांना मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. त्या संदर्भात बोलताना विखे म्हणाले, संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराबाबत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराचा निर्णय करण्यात आला होता. आता केंद्रानेही त्याला मंजुरी दिली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे विखे यांनी आभार मानले.
ज्यांना तीन वर्षे सत्तेत राहिल्यानंतर शेवटच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांकराचा निर्णय घेण्याची बुद्धी सुचली असली तरी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार दिलेले आश्वासन पूर्ण करणारे सरकार असून महाविकास आघाडी सरकारला या निर्णयाचे श्रेय घेण्याचा कोणताही अधिकार नाही मात्र या नेत्यांना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची सवय झाल्याचे ते म्हणाले.

