महाराष्ट्र संवाद न्यूज
केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल कधी लागणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच या महत्त्वाच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी भाष्य केले आहे. त्यामुळे सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याचा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आणखी फार काळ चालणार नाही. तारीख पे तारीख अशी स्थिती या केसची आता होणार नाही तर हा युक्तिवाद याच आठवड्यात संपवून निकालदेखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबतीत हे वक्तव्य केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे तसेच ठाकरे गटातील आमदार-खासदारांची धाकधुक आणखी वाढली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे एकमेश आशेचा किरण म्हणून ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे पाहिलं जातंय.
त्यासोबतच सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या तारीख पे तारीख यामुळे हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करणार की तत्पूर्वीच या सत्ता संघर्षाचा निकाल लागणार याबाबत उत्सुकता होती.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अर्थात शिवसेना खटल्याचा निकाल याच आठवड्यात संपवायचा आहे, असं वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलंय. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल हाती येण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असल्याचं म्हटलं जातंय. कोर्टात आज ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि त्यानंतर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. लंच ब्रेकनंतरही कामत यांचा युक्तिवाद सुरु राहील. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवादाला सुरुवात करतील.

