महाराष्ट्र संवाद न्यूज
गेल्या बारा वर्षापासून विविध समाज उपयोगी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिवजयंती उत्सव युवक समितीच्यावतीने यावर्षीदेखील महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १०३७ शिवभक्त रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर आता यावर्षी ११११ रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. या महा रक्तदान संकल्पमध्ये संगमनेरकरांनी सहभाग घेण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
एका तपाची वाटचाल पूर्ण करणाऱ्या उत्सव समितीने यापूर्वी कोरोनासारख्या भयंकर आजारातदेखील गोरगरिबांना अन्नदान केले होते. सांगली, सातारा सारख्या भागात पूरग्रस्त नागरिकांना किराणा व संसार उपयोगी वस्तूचे वाटप केले. गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घेतला जातो. शिवरायांचे विचार मनामनात रुजवण्यासाठी व्याख्याने तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. गतवर्षी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल १०३७ शिवभक्तांनी रक्तदान केले होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्ताची निर्मिती कुठल्याही कारखान्यात होत नाही. ती मानवाच्या शरीरात होत असल्याने, आणि अपघातग्रस्त अथवा अत्यवस्थ रुग्णांना वेळेत रक्तदानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या या रक्तामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचू शकत असल्याने यावर्षी ही संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रक्ताचा प्रत्येक थेंब मोलाचा आणि अनमोल असल्याने जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या महा रक्तदान संकल्प सहभाग घेत रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी (५ मार्च) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेदरम्यान संगमनेर शहरात सुंदर गल्ली येथील सोमेश्वर मंदिर परिसर, संगमनेर बस स्थानक, तिरंगा चौक, पद्मनगर येथील बालाजी मंदिर येथे तर निमगाव भोजापूर, पेमगिरी, सुकेवाडी, करुले आणि तळेगाव या ठिकाणी हे महा रक्तदान शिबिर पार पडणार आहे. अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष कपिल टाक, उपाध्यक्ष अक्षय कर्पे व विक्रम कतारी, कार्याध्यक्ष सागर कानकाटे व निलेश पवार, प्रकल्प प्रमुख तुषार ओहरा यांनी दिली.

