महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर :
तडजोडीवरच स्त्रियांचे सर्व जीवन अवलंबून आहे. लग्न हा करार नाही तर संस्कार आहे, याकरता महिलांनी आत्मविश्वासाने स्वत:चा विकास करावा, असा संदेश शारदा शिक्षण संस्थेच्या सहसचिव ॲड. ज्योती मालपाणी यांनी दिला.
सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय व संगमनेर साहित्य परिषद यांच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन समारंभात त्या बोलत होत्या. याप्रसंगी सिद्धकला महाविद्यालयाच्या सेक्रेटरी डॉ. जयश्री सराफ, प्राचार्य डॉ. राधाकृष्ण शर्मा, प्रथम महिला शरीरसौष्ठवपटू सुप्रिया ईल्हे, संगमनेर साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष मेजर लक्ष्मण ढोले, महिला प्रतिनिधी अनघा खेडकर आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व भगवान धन्वंतरींच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी डॉ. जयश्री सराफ यांच्या हस्ते ज्योती मालपाणी व अनघा खेडकर यांचा, डॉ. अबोली गांधी यांच्या हस्ते सुप्रिया इल्हे यांचा, डॉ. राधाकृष्ण शर्मा यांच्या हस्ते डॉ. लक्ष्मण ढोले यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अमृता जोर्वेकर, सुमन देशपांडे यांना सुप्रिया ईल्हेंच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुप्रिया ईल्हे यांनी खडतर प्रयत्न केल्यानंतरच कोणत्याही स्पर्धेत यश मिळते. दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच घरातील मंडळींची साथ यामुळे महिलांना कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पाठबळ मिळते असे सांगून त्यांनी सर्व पुरुषांना घरातील स्त्रियांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
लक्ष्मण ढोले, डॉ. जयश्री सराफ, डॉ. राधाकृष्ण शर्मा, दर्शन जोशी, अनघा खेडकर आदींची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन सूरज ठोंबरे यांनी केले. परिचय डॉ. रेणुका देशपांडे यांनी करुन दिला. आभार बाळकृष्ण महाजन यांनी मानले. संगमनेर साहित्य परिषदेचे सदस्य व सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

