महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी, कलाकार आणि नाट्यनिर्माते महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांत एकाच दिवशी ७५ महाविद्यालये, ७५ ठिकाणी, ७५ नाट्य प्रयोग सादर करीत आहेत. यातील एक नाट्यप्रयोग संगमनेर महाविद्यालयात गुरुवारी (२३ मार्च) होत आहे.
या अनोख्या प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय, सांस्कृतिक विभाग आणि आर्टिस्टिक हयूमन्स संयुक्त विद्यमाने गुरुवारी एकाच वेळी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर नाटकात अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर महाविद्यालयाची (स्वायत्त) निवड झाली आहे. संगमनेर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या कलावंत विद्यार्थ्यांनी सदर नाटकात सहभाग घेतला आहे.
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्याचा एक दिवस, भारताच्या प्रवासाची कहाणी आणि अमृत महोत्सवाची भावना साजरी करण्याची एक अनमोल संधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, आर्टिस्टिक हयूमन्स आणि सांस्कृतिक विभागाने संगमनेर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागास मिळवून दिली आहे.
संगमनेर महाविद्यालयाच्या श्री साईबाबा सभागृह येथे गुरुवारी सकाळी 10 वाजता ‘आझाद हिंदची गाथा’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तेव्हा नाटकाचा आनंद घेण्यासाठी सर्व विद्यार्थी व संगमनेर शहरातील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र पाटील, सह समन्वयक डॉ. बाळासाहेब पालवे यांनी केले आहे.

