महाराष्ट्र संवाद न्यूज
दिल्ली:
देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना समोर आली आहे. सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली आहे. देशभरातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. त्यांना कोर्टाने जामीनही मंजूर केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. संसदेमध्ये अदानी प्रकरणावरून आरोप करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप अतिशय आक्रमक झाल्याचे दिसत आहे. परदेशातील एका वक्तव्याप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून भाजपचे खासदार आक्रमक झाल्याचे दिसून येत होते. लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज त्यामुळे अनेकदा तहकूब देखील करावे लागले.
या परिस्थितीतच सुरत कोर्टाचा गांधीं विरोधातील निकाल समोर आला आहे. दोन वर्षाची शिक्षा देतानाच कोर्टाने त्यांना जामीन देखील मंजूर केला तसेच या निर्णया विरोधात अपील करण्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसाची मुदत देखील देण्यात आली होती. अशा परिस्थितीतच लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार २३ मार्च २०२३ पासून म्हणजेच गुरुवारपासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत.
राहुल गांधी आज सकाळी लोकसभेत आले. त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी करत काँग्रेस खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये धाव घेतल्याने गोंधळ उडाला. काही वेळाने लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. काँग्रेसने आज देशाच्या राजधानीत मोठ्या आंदोलनाची योजना आखली होती.

