महाराष्ट्र संवाद न्यूज
उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. पण तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा. काँग्रेस पक्षाची साथ सोडा. राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करतात. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा आणि बाहेर पडा. फक्त सभेतूनच वल्गना करू नका, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बावनकुळे यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत रविवारी टीका केली. ५२ काय १५२ कुळे खाली उतरली तरी शिवसेना बुडवू शकणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या ज्या कुळाला उंची दिली होती. तो तुम्ही बुडविला आहे. तुम्ही ठाकरे कुटुंबाचं नाव बुडवत आहात, हिंमत असेल तर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसपासून वेगळं होऊन दाखवा, असं आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५० वेळेला काँग्रेस पक्षांने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भोगले. भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरे यांच्यात धमक असेल तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे, नुसत्या तोंडाच्या वाफा काढू नका, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
जे उद्धव ठाकरे कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाही. मागच्या दारावरून विधानपरिषद गेलेले. उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात. ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही. त्यांनी निवडणूकीच्या गप्पा मारू नये. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील २०० जागा जिंकून येऊ, असे बावनकुळे म्हणाले.

