महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्यात आणि देशात हुकूमशाही पद्धतीने सध्या कारभार सुरू आहे. भाजप जाती-जातीत आणि धर्मामध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. हे लोक देशातील लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम करत असून, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
पटोले म्हणाले, मनुवादी व्यवस्थेने अन्नदाता, गरीब माणूस, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. मोदी- अदाणींचा संबंध काय? अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील आणि परदेशातील कंत्राटे देण्याचे कारण काय? हे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले म्हणून राजकीय सूडबुद्धीने भाजपा सरकारने राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली.
नीरव मोदी, ललित मोदी, गौतम अदाणी यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा लुटला, या चोरांना चोर म्हटले तर देशात गुन्हा ठरतो, नरेंद्र मोदींचा भांडाफोड होऊ नये म्हणून खोट्या केसमधून राहुल गांधी शिक्षा सुनावण्यात आली, खासदारकी रद्द केली आणि सरकारी घर सोडण्यास सांगून बेघर केले. गांधी कुटुंबाने देशाला सर्वस्व अर्पण केले आहे, देशासाठी बलिदान दिले, त्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि स्वतःचे घर दान केले आणि ते सरकारी घरात राहत असतानाही त्यांना बेघर करण्याचे पाप मोदी सरकारने केल्याच ते म्हणाले.
सध्या देशात ब्रिटीश सरकारसारखीच जुलमी सत्ता आहे, त्यांच्या हातातून देशाला वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षावर आहे. मोदी-अदाणींच्या भ्रष्ट युतीचा भांडाफोड करा, सर्वसामान्य जनतेचे पैसे कसे लुटले, राहुल गांधी जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय आकसातून कारवाई केली, हे जनतेपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेस पक्षात विविध प्रकारचे ३९ सेल आहेत, या सेलच्या माध्यमातून प्रत्येक समाज घटकाला काँग्रेस विचारधारेशी जोडून हुकूमशाही आणि गरीब, दलित आदिवासी आणि अल्पसंख्याकविरोधी विरोधी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा, असेही ते म्हणाले.

