महाराष्ट्र संवाद न्यूज
वर्ल्ड क्रिएटिव्हिटी फोरमच्यावतीने भारतीय हिंदी कवयित्री, कादंबरीकार मनीषा खटाटे यांच्या ‘मरुस्थल’ या काव्यसंग्रहावर नेपाळमधील नेपाळगंज शहरात समीक्षात्मक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. तत्वज्ञानात्मक परिभाषेत हिंदी साहित्यात एका स्त्रीने लिहिलेले हे पहिले आणि रांगेय राघवच्या ‘मेधावी’नंतरचे हे दुसरे खंडकाव्य आहे.
एप्रिलच्या प्रारंभी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मरुस्थळच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन देखील भाषा आयोगाचे सदस्य, कवी, लेखक डॉ. अमर गिरी, नेपाळ भाषा आयोगाचे सदस्य, कवी, लघुकथा लेखक गोपाळ अश्क यांनी केले. यावेळी नेपाळचे ज्येष्ठ साहित्यिक सनत रेग्मी, डॉ. राजेंद्र खटाटे उपस्थित होते. मराठी भाषिक हिंदी स्री साहित्यिकास नेपाळमध्ये असा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या कार्यक्रमामुळे भारतीय साहित्य आणि नेपाळी साहित्य संबंध दृढ होण्यास मदत होईल आणि अनुवादाच्या माध्यमातून साहित्यिक देवाण घेवाणही होईल. यामुळे सर्जनशील मानवता निर्माण होईल. या खंडकाव्याची नेपाळी भाषेत नेपाळचे सुप्रसिद्ध समीक्षक हरी तिमिल्सिना यांनी समीक्षा केली. नेपाळी-हिंदी भाषेत केलेले आयोजन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
यावेळी वर्ल्ड क्रिएटिव्हिटी फोरम नाशिकच्यावतीने नेपाळगंज या कार्यक्रमात ज्येष्ठ नेपाळी साहित्यिक सनत रेग्मी, भेरी साहित्य समाजाचे अध्यक्ष हरी तिमिल्सिना, मीना बराल, शारिक रब्बानी, कथाकार किरण आचार्य, कल्पना पौडेल, नेपाळ-भारत मैत्री संघाच्या उपाध्यक्षा सुषमा शर्मा आणि कल्पना खरेल या आठ साहित्यिकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

