महाराष्ट्र संवाद न्यूज, शिर्डी
उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत विश्वासघाताचे राजकारण केले आहे, अशा विश्वासघाती राजकारणाला भारतीय जनता पक्षात अजिबात थारा नसल्याने भाजप व ठाकरे पुन्हा एकत्र येण्याबाबत शंका असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आलेले बावनकुळे शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयावर टीका करण्यास हरकत नाही मात्र आम्ही कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही. जाणीवपूर्वक टीका टिप्पणी योग्य नाही. शरद पवार, अजित पवार सरकारवर टीका करतात तो त्यांचा अधिकार आहे.
भाजप आणि शिवसेनेचे काम बघून २०२४ मध्ये अनेकजण आमच्याकडे उड्या मारतील. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी सभागृहात अर्थसंकल्प वाचत होते, त्यावेळी विरोधकांचे चेहरे लहान झाले होते. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पानंतर अनेक विरोधक भाजपकडे आलेले असतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रभू श्रीरामाच्या दर्शनाचा अधिकार सर्वांना आहे. अयोध्येला दर्शनासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनेकदा जातात. अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे ही देशातील प्रत्येकाची इच्छा आहे. प्रभू श्रीरामचंद्र आराध्य दैवत असून त्यांच्या दर्शनावरून कोणी टीका करू नये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दर्शनाला जाणार असे सांगितले त्यावेळी कोणी टीका केली का? असा प्रश्न उपस्थित केला.
विकास व्हावा यासाठी जरूर टीका केली जावी. विरोधकांनी सरकार पुढे प्रश्न मांडावे. देश आणि राज्यातील प्रश्नाबाबत आंदोलने करा. मात्र महाराष्ट्र यापासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे जनतेच्या मनात नकारात्मक विचार पेरले जात असून आपण यातून बाहेर निघायला हवे, असे देखील ते म्हणाले.

