महाराष्ट्र संवाद न्यूज
वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव अशा कठीण परिस्थितीतून मोठी गुंतवणूक करत फुलवलेल्या शेतीचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी आग्रही मागणी माजी कृषी व महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
आमदार थोरात व डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील सावरचोळ, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी येथील गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, संतोष हासे, सोमनाथ गोडसे, विलास कवडे, बाळासाहेब कानवडे, मारुती कवडे, संदीप गोपाळे, बाळकृष्ण गांडाळ, शिवाजी वलवे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात असून वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा मोठ्या अडचणीतूनही मोठी गुंतवणूक करत शेतकरी शेती फुलवतो. मात्र अवकाळी पाऊस गारपीट यामुळे उभी केलेली पिके जमीनदोस्त झाली. अवकाळी पावसामुळे राज्यभरात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. राज्यात जिथे जिथे नुकसान झाले, त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून फक्त घोषणा न करता शेतकऱ्यांना सरकारने जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे.
तालुक्यात गारपीट व अवकाळीने टोमॅटो, घास, मका, गवत चारा यासह डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांचे पत्रे उडाले. या सर्व नुकसानग्रस्तांना आमदार बाळासाहेब थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात यांनी भेटी देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाला तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त मदतीच्या सूचना केल्या आहेत. आमदार थोरात यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
राम हे सर्वांचे श्रद्धास्थान असून राम हा माझ्या शेतकरी बांधवांमध्ये आहे. शेतकरी संकटात असताना देव अयोध्येत कसा राहील तोसुद्धा या संकटात काळात इथे आला असेल. म्हणून सरकारने वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतीमालाचे पडलेले बाजार भाव यावरून लक्ष वळवण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करण्याऐवजी प्रत्यक्ष शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली पाहिजे आणि ती तातडीने मिळाली पाहिजे. अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकारमधील मंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, मात्र उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी त्यांनी मदतीची मोठी घोषणा करावी, अशी मागणी थोरात यांनी केली.

