संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
नगर मनमाड महामार्गाची काळजी करणा-या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वर्षानुवर्षे सर्व सत्तास्थानं हातात असतानाही वीस वर्षांपासून रखडलेल्या कुप्रसिध्द संगमनेर – कुरण – पोखरी हवेली रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस हाफीज हैदर शेख यांनी उपस्थित केला आहे.
शेख यांनी म्हटले की, संगमनेर पोखरी हवेली हा रस्ता अतिशय दयनिय झाला आहे. परंतू विकासाच्या गप्पा मारणा-यांना बाहेरच्या रस्त्यांची काळजी करुन बोलायला वेळ आहे. परंतू संगमनेर शहरानजीक असणा-या रस्त्यांवर बोलायला सवड सापडत नाही याचे आश्चर्य वाटते. संगमनेर शहराच्या बाजारपेठेत कुरण, देवकौठे, पारेगाव खुर्द, बुद्रूक, आशापिरबाबा, तळेगाव, नान्नज, पोखरी हवेली ही गावे कुरण रस्त्याला जोडली गेलेली आहेत, त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक असते.
शेतक-यांसह शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्व गावांमधून शहरामध्ये येत असतात. मात्र वर्षानुवर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामाकडे पाहायला तालुक्याच्या नेतृत्वाला वेळ नाही. या रस्त्याच्या कामाची निविदा आपल्या बगलबच्चांना किंवा नातेवाईकांना मिळाली नाही म्हणून रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे का? असा उपरोधिक सवाल करत शेख यांनी म्हटले आहे की, या सर्व गावांमधील जनता दुष्काळाने अधिक होरपळलेली आहे. त्यांना पाणीही मिळालेले नाही, कमितकमी चांगला रस्ता तरी देण्याची व्यवस्था सुसंस्कृत नेतृत्वाने करावी.
नेहमीच विकासाच्या गप्पा करणा-यांनी हा तालुका संपूर्णपणे ठेकेदारांच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे दुस-याच्या गावात जावून रस्त्यांची काळजी करण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील रस्त्यांच्या कामाची काळजी केली तर बरे होईल. आपले ठेवायचे झाकून आणि दुस-यांचे पाहायचे वाकून ही वृत्ती योग्य नव्हे हे संगमनेर तालुक्याच्या नेतृत्वाने आता सोडली पाहीजे असे शेवटी म्हटले.

