महाराष्ट्र संवाद न्यूज
विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या लाल वादळाच्या शिष्टमंडळासमवेत राज्याचे आदिवासी मंत्री विजयकुमार गवित, कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये बैठक सुरू आहे. बैठकीत काय निर्णय होतात हे लवकरच पुढे येणार आहे.
नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने, अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी लाल वादळ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहे.
बुधवारी 26 एप्रिलला सायंकाळी अकोल्यातून सुरू झालेले हे वादळ रात्री संगमनेरच्या धांदफळ येथील रामेश्वर मुक्कामी थांबले आहे. दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हे वादळ महामुक्काम ठोकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूलमंत्र्यांसह तब्बल मंत्रिमंडळातील तीन मंत्री संगमनेरात आले असून प्रांताधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीमध्ये या मंत्र्यांची शिष्टमंडळा समवेत बैठक सुरू आहे.
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित आहे. कॉम्रेड अजित नवले, डॉ. अशोक ढवळे यांच्यासह 30 जणांचे शिष्टमंडळ संगमनेरमध्ये आले असून बैठकीतील निर्णयानंतर मोर्चाची दिशा स्पष्ट होणार आहे.

