अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर अहमदनगरमध्ये बदलून आलेल्या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 9 मे) जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पदांचा पदभार हाती घेतला.
शिवराज मोरे, हेमलता बढे व पल्लवी निर्मळ या उपजिल्हाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेतली. भेटीनंतर मोरे यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदाची, बढे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी पदाची व निर्मळ यांनी भूसंपादन उपजिल्हाधिकारी क्रमांक एक या पदाचा कार्यभार हाती घेतला आहे.
4 मे रोजी उपजिल्हाधिकारी संवर्गातील तर 8 मे रोजी तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या पदाचा पदभार हाती घेण्यास सुरुवात केली आहे. संगमनेर देखील प्रांताधिकारी व तहसीलदारांची बदली झाली असून या रिक्त जागी अनुक्रमे शैलेश हिंगे व धीरज मांढरे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी मंगळवार पर्यंत संगमनेरचा पदभार स्वीकारलेला नव्हता. येत्या दोन दिवसात दोन्ही नवे अधिकारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

