नागपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
जाऊ द्या.. ते ज्येष्ठ नेते आहेत.. बोलत असतात.. इतकं लक्ष द्यायचं नसतं! अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांने केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही असा टोला लगावला होता. त्यानंतर विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाची दखल घेत शरद पवारांनाही फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल आहे.
फडणवीस म्हणाले, आता जर शरद पवारांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच होईल. मग इतिहासात जावं लागेल. वसंतदादांचं सरकार कसं गेलं इथून सुरुवात होईल. त्यामुळे जाऊ द्या. ते ज्येष्ठ नेते आहेत. बोलत असतात. इतकं लक्ष द्यायचं नसतं, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं आहे.

