नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज)
२ हजार रुपयांच्या नोटे संदर्भात आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. ही नोट चलनातून बाद करण्यात आली असून ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बँकेत जमा करून दुसऱ्या चलनाद्वारे बदलून घ्याव्या लागणार आहे. नोटा बदलताना एकावेळी फक्त दहा नोटा बदलून मिळतील. यामुळे ऐन उन्हाळ्यात पुन्हा एकदा बँकांसमोर भल्या मोठ्या रांगा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट परत करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. या नोटेची कायदेशीर निविदा राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल.
तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे तात्काळ थांबवण्याचा सल्ला दिला आहे. ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. २०१६ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या पाचशे रुपयांच्या नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट जारी केली होती. आता २ हजार रुपयांची नोटदेखील चलनातून बाद करण्यात आली असल्याने पुन्हा एकदा नोटबंदीचा सामना करावा लागणार आहे.

