महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु केलेल्या वाळू धोरणाची अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, वाळू व्यवसायातून सुरु असलेले राजकारण आणि गुन्हेगारीकरण थांबविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील वाळू विक्री केंद्रातून २० हजार ब्रास वाळू उपलब्ध केली आहे. यामधून राज्य सरकारच्या तिजोरीत ६०० रुपये दराने थेट रक्कम जमा झाली आहे.
राज्य सरकार हे सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका सरकार घेत आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी २२ जून रोजी पुण्यामध्ये खासगी आणि सहकारी दूध संघ चालकांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पशुखाद्य कंपन्यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
दूध उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही ही भूमिका घेवून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभे राहील. अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. 

