महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथीचे सत्र सुरूच आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेना (ठाकरे) प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणून गोऱ्हे यांच्याकडे बघितले जात होते. त्यामुळे गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश आश्चर्यकारक मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यावेळी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या गोऱ्हे यांच्याकडे महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून बघितले जात होते. शिवसेनेची भाजप बरोबरची युती तुटल्यानंतर त्यांनी ठाकरेंची बाजू समर्थपणे सांभाळली होती. शिवसेना फुटल्यानंतर देखील त्या ठाकरेंसोबत ठाम होत्या. त्यावेळी देखील त्या ठाकरेंची बाजू सातत्याने मांडताना दिसून येत होत्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील त्या विश्वासातील नेत्या होत्या.
उपसभापती असलेल्या गोऱ्हे पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करत प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्ष नेते असताना केला होता. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला होता. या ठरावाला प्रसाद लाड यांनी अनुमोदन दिलेले आहे. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेतला जाणार आहे.

