महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांचे सर्वमान्य नेतृत्व आणि संगमनेरचा विकास राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे स्पष्ट करत यावर्षी देखील राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मंगळवारी माजी मंत्री, आमदार थोरात यांच्या ‘यशोधन’ या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीराम कुऱ्हे, पी. वाय. दिघे, अनिल सोमणी, नामदेव कहांडळ, गोरक्षनाथ वर्पे, विजय हिंगे, प्रा. बाबा खरात, संजय कोल्हे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.
यावेळी डख यांनी यशोधन कार्यालयातील कामकाजाची पद्धत समजावून घेतली. भेटी दरम्यान डख यांनी उपस्थितांशी संवाद साधताना यावर्षीच्या पावसाविषयी अंदाज वर्तविला. 18 ते 24 जुलै दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात तर 12 ते 14 जुलै दरम्यान संगमनेर तालुक्यात पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
डख म्हणाले, यावर्षी निसर्गचक्र 22 दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. तरीदेखील राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल. यावर्षी पाऊस उशिराने सुरू होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाऊस पुढे ढकलला असला तरी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात सर्वत्र चांगला पाऊस राहणार आहे.
उत्तर भारतात पावसाने नदी नाले तुडुंब झाले असून मागील वर्षे सारखा यावर्षी देखील राज्यात समाधानकारक व चांगला पाऊस होणार आहे.
विदर्भ ते कोकण या सर्व विभागांमध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची लोकप्रियता आहे. शेती, सर्वसामान्य माणूस यांच्याशी निगडित प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यांच्या नेतृत्वाबद्दल संपूर्ण राज्यासह आपल्याला कायम आदर राहिला आहे. जनसामान्यांची कामे करताना 24 तास अविरत सेवा देणारे ‘यशोधन’ हे अभिनव कार्यालय असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, पाऊस आणि पंजाबराव डख हे एक समीकरण झाले असून शेतकऱ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय अशा परिस्थिती असताना त्यांनी यावर्षी चांगला पाऊस होणार ही दिलेली सुखद वार्ता सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

