महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री काँग्रेस गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्र्यांचीच शाळा घेतली. विरोधी आमदारांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे हे सभागृहाला शोभत नसल्याचा खोचक टोला लावताना थोरात चांगलेच संतापले असल्याचे दिसून आले.
विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आज सभागृहात आक्रमक झाले. मंत्री गांभीर्यपूर्वक प्रश्नांचा अभ्यास करत नाही, बिना तयारीचेच सभागृहात येतात, असा संताप थोरात यांनी व्यक्त केला.
थोरात म्हणाले, सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास हा प्रश्नोत्तराचा राहील हे आपण सर्वानुमते ठरविले. सभागृहातील सदस्य अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात. मात्र संबंधित विभागाचे मंत्री या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असे दिसते. मंत्री सभागृहात येताना कोणतीही तयारी करून येत नाही, माहिती घेऊन येत नाही
सभागृहात प्रश्न उपस्थित करणारे सर्व सदस्य सरकारकडून उत्तराची अपेक्षा ठेवतात. मात्र कोणताही मंत्री समाधानकारक उत्तर देत नाही. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी वारंवार उपमुख्यमंत्र्यांना उभे राहावे लागते हे या सभागृहाला शोभत नाही.
विधानसभेच्या सन्माननीय अध्यक्ष यांनी मंत्र्यांना सक्त ताकीद द्यावी आणि विना तयारी सभागृहात येऊ नये अशा सूचना कराव्यात, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

