महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – योगाला क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाला आहे. यापुढील काळात योग हा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आगामी काळामध्ये अधिक प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयात क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनचे सेक्रेटरी इन जनरल नामदेव शिरगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून डॉ. मालपाणी बोलत होते. क्रीडा संवर्धन समिती सदस्य नरेंद्र चांडक, रवींद्र पवार, संदीप चोथवे यांच्यासह श्रमिक ज्युनियर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. मालपाणी म्हणाले, नियमित अभ्यासासोबत मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आणि योगसाधना आयुष्याला दिशा देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिरगावकर यांनी क्रीडा क्षेत्रातील विविध सेवा संधी आणि या क्षेत्रातून कशा पद्धतीने करिअर घडू शकते याबाबत खेळाडूंना माहिती देताना खेळ आणि योग हे निरामय आयुष्यासाठी नित्य गरजेचे असल्याचे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांनी केले. बक्षीस वितरणाचे निवेदन क्रीडा संचालक डॉ. अजित कदम यांनी तर सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. आभार प्रा. निलेश गुंजाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. राजू त्रिभुवन, प्रा. प्रवीण गुंजाळ, प्रा.भागवत उगले तसेच शिक्षकेतर सहकारी संजय काशीद आणि दिलीप शेरमाळे यांनी परिश्रम घेतले.

