महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात देशभर शांततावादी नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये देखील शांतता प्रिय स्त्री-पुरुष नागरिकांचा शांती मोर्चा येत्या शुक्रवारी (ता.28 जुलै) आयोजित केल्याची माहिती समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली.
शिवूरकर यांनी म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर अशांत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमध्ये शांतता निर्माण करू शकलेले नाही. मणिपूर मधील हिंसाचार आणि तेथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराने देशातील संवेदनाशील नागरिक अस्वस्थ झाले आहेत. सरकारने मणिपूर मधील इंटरनेट सेवा बंद केल्याने दहशतीत वाढ झाली आहे.
सुमारे 60 हजारावर नागरिक बेघर झाले आहे. दीडशेवर स्त्री-पुरुष मारले गेले. 3 मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला, ही घटना गेल्या आठवड्यापर्यंत देशाला समजू शकली नाही. आरोपींवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. अत्याचार करणारे गुन्हेगार मोकाट फिरत होते. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ म्हणणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांनी या विषयावर मौन धारण केले होते.
सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर पंतप्रधानांनी या घटनेवर भाष्य केले. त्यात मणिपूरमधील हिंसाचाराचे गांभीर्य दुर्लक्षित करून पंतप्रधानांनी विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यातील हिंसक घटनांचा दाखला दिला. केंद्र व राज्य सरकारची भूमिका हिंसाचार करणाऱ्यांना समर्थन देणारी ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये हा मोर्चा होत असल्याची माहिती शिवूरकर व अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी दिली.
संगमनेर बस स्थानकातील दत्त मंदिरापासून शुक्रवारी दुपारी एक वाजता निघणाऱ्या या शांती मोर्चात संगमनेरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रा. शिवाजी गायकवाड, कारभारी देव्हारे ॲड. ज्ञानदेव सहाने, विनोद गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, प्रा. बाबा खरात, बाबुराव गायकवाड, इंदुमती घुले आदींनी केले आहे.

