महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे – कारमधून येत-जात असल्याचे भासवत तिघेजण रस्त्यावरील प्रवाशांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल, दुचाकीची चोरी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडलेले तिघेही आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहेत.
हे आहेत आरोपी: शुक्रवारी (दि. 28 जुलै) रात्री पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात पोलिसांनी पकडलेल्या या टोळीकडून मोबाईल आणि त्यांच्या ताब्यातील कार (एम.एच. 15 जी.एफ. 7288) जप्त केली आहे. प्रशांत अण्णासाहेब जाधव (वय 23 वर्ष) सचिन जयराम पवार (वय 30 वर्ष) व शिवतेज चंद्रहर्ष नेहे (वय 26 वर्ष, तिघेही रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी मोबाईल चोरीत पकडलेल्या तिघांची नावे आहेत.
अशी घडली होती घटना: 19 जुलैच्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर संगमनेर तालुक्यात असलेल्या आळेखिंडीमध्ये सचिन रमेश सानप (रा. रूम नंबर 706, फेज एक, विस्पलिंग मोबाईल सोसायटी, बाणेर, पुणे) हे पाऊस आल्याने आपल्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून मोबाईल खिशामध्ये ठेवत होते.
याच दरम्यान समोरून आलेल्या कारमधून दोघांनी खाली उतरत सानप यांचा मोबाईल खिशातून काढून घेतला तर दुसरा त्यांच्या ताब्यातील दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करत असताना सानप यांनी आरडाओरडा केला त्यामुळे चोरट्यांनी दुचाकी सोडून देत मोबाईल पळवून नेला. याबद्दल सानप यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना त्यांना मोबाईल चोरी करणारे आरोपी नारायणगाव परिसरात असल्याची माहिती समजली. त्यामुळे पथकाने या माहितीच्या आधारे तिघा संशयतांना नारायणगाव परिसरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडून मोबाईल व कार जप्त करण्यात आली आहे. तिघाही आरोपींना पुढील तपासासाठी आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई: पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले व निलेश सुपेकर यांच्या पथकाने आरोपींना पकडण्याची कारवाई केली आहे.

