महाराष्ट्र संवाद न्यूज
वर्धा : रखडलेल्या कामाविषयी विचारणा केल्याने आमदार रणजीत कांबळे यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून आमदार कांबळे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्ध्यातील देवळी तालुक्यामधील सोनेगाव ग्रामपंचायतचे सदस्य गणेश सातव यांनी गावातील एका भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार कांबळे यांना रखडलेल्या कामाविषयी विचारणा केली होती. या कामाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी झाले तरीही अद्याप काम सुरू झाले नाही याबद्दल सातव यांनी नाराजी व्यक्त केल्याने कांबळे यांनी त्यांना मारहाण केली.
कांबळे काँग्रेसचे आमदार असल्याने मारहाणीच्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. कार्यकर्त्याला न्याय मिळायला हवा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली होती.
मात्र आमदार कांबळे यांच्यावर कारवाई होत नसल्याने भाजपने पत्रकार परिषद घेत ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करणे अयोग्य असल्याचे सांगत कांबळे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच त्यांना गाव बंदी करण्याचा इशारा देण्यात आला होता.


