महाराष्ट्र संवाद न्यूज
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा पर्यावरण समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अशासकीय सदस्यपदी संगमनेरमधून गणेश बोऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यावरण विषयक व्यापक जगजागृतीच्या कार्यक्रमाच्या यशस्वी व सक्षम अंमलबजावणी करण्यासाठी, पर्यावरणाशी संबंधित विभागांशी समन्वय करून स्थानिक पर्यावरणीय समस्या शोधून त्यावरील उपाययोजनांची शिफारस वरिष्ठ पातळीवर करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. समितीचा कालावधी दोन वर्षांसाठी असेल.
जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीमध्ये पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या दोन प्रतिनिधींची निवड केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या पदावर बोऱ्हाडे यांची एकमेव निवड केली आहे. बोऱ्हाडे यांच्याशिवाय या समितीमध्ये पर्यावरण क्षेत्रातील दोन तज्ञ प्रतिनिधी म्हणून अहमदनगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य व अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉलेजचे पर्यावरण विभागाचे डॉ. सतीश कुलकर्णी यांची देखील निवड करण्यात आली आहे.
या तीन प्रतिनिधी शिवाय समितीमध्ये सदस्य पदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा जनसंपर्क व माहिती अधिकारी, जिल्हा वन अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील विधानसभा विधान परिषदेचे सर्व आमदार यांचा देखील समावेश असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हे सदस्य सचिव, तर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ या समितीचे अध्यक्ष असतील.
वर्षातून या समितीच्या दोन बैठका घेतल्या जात असून पहिलीच बैठक जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. बोऱ्हाडे यांनी पर्यावरणाच्या अनुषंगाने केलेल्या कामाची दखल घेत त्यांची या समितीत निवड करण्यात आली आहे.


