महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यासाठी रविवारी (ता. ७) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह विविध मान्यवर संगमनेरमध्ये येत आहे. राज्यस्तरीय पुरस्कार वितरणासह पाच दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच्या सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते रविवारी पहिल्याच दिवशी माजी आमदार उल्हासदादा पवार यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने, जळगावच्या जैन उद्योग समूहास डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने तर कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील यांना सहकारातील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे निरीक्षक रमेश चेन्नीथला, एच. के. पाटील, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते आमदार भास्करराव जाधव, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याचबरोबर पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगमनेरकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे मेजवानी मिळणार आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दर्जेदार व संस्मरणीय ठरणाऱ्या जयंती महोत्सव कार्यक्रमांसाठी गेल्या काही दिवसांपासून जाणता राजा मैदानावर सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनीही या तयारीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यामध्ये प्रशस्त बैठक व्यवस्था, साठ फूट बाय साठ फूटचे भव्य स्टेज, जर्मन हँगर मंडप, साऊंड सिस्टिम, एलईडी व्यवस्था, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, प्रशस्त पार्किंगचा समावेश आहे.
रविवारपासून सुरू होत असलेल्या या सोहळ्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक, महिला, युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.


