महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : स्थानिक सत्ताधाऱ्यांना त्यांच्या मंत्रीपदाच्या व चाळीस वर्षाच्या कार्यकाळात लोकांचे प्रश्न सोडविता आले नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या संजय गांधी नगर झोपडपट्टी व वडार वस्ती झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडल्याची माहिती संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी दिली.
मंगळवारी मंत्री विखे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांच्यासह संजय गांधी नगर वडार वस्ती येथील प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये या झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भात चर्चा झाली. या झोपडपट्टीतील नागरिकांना कुठल्या योजनेतून घरे मिळवून देता येतील यासंदर्भात विविध योजनांचा या बैठकीत उहापोह करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या या नागरिकांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात काहीही केले नाही.

भाजपने एखाद्या विषय हाती घेतल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून देखील तातडीने पत्रव्यवहार करून त्या-त्या विषयासंदर्भातील श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील जहागीरदार यांनी केला आहे.

