महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. १७ मार्च, मुंबई
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर होऊन निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज रविवारी मुंबईत खासदार गांधी यांच्या जाहीर सभेने होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
मुंबईत शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल. या सभेसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.
राहुल आज, रविवारी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी पदयात्रा काढणार आहेत. दोन महिने ६२०० किलोमीटरचा प्रवास करत मणिपूरहून निघालेली गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्मारक स्थळी शनिवारी दाखल झाली. यावेळी खासदार गांधी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर धारावीत गांधी यांची सभा देखील झाली.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वेणुगोपाल, प्रियंका गांधी, मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर AICC चे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल, बी. एम. संदीप, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय निरुपम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, सचिन सावंत, राजन भोसले, आदी उपस्थित होते.


