
सोमवार, दि.२२ एप्रिल
राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासह दोघा अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
सदाशिव लोखंडे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांच्या समवेत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार वैभव पिचड आदींचा समावेश होता.
लोखंडे यांनी शिवसेनेकडून तीन तर चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी प्रत्येकी एकेक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासह आणखी काही अर्ज शेवटच्या दोन दिवसात दाखल होण्याची चिन्हे आहेत. या शिवाय सोमवारी आठ व्यक्तींनी दहा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतले असल्याची माहिती देण्यात आली.


