बुधवार, दि. ८ मे
७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाल संपत आहे. शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदारसंघातून दोन जागांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून या चार जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी १० जूनला मतदान होणार आहे.
मंगळवारी राज्यातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची ही मोठी घोषणा केली आहे.
विधान परिषदेतील मुंबई पदवीधर विधान परिषद मतदार संघाचे आमदार विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन वसंत डावखरे, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातील कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा कार्यकाल संपणाऱ्यामध्ये समावेश आहे.

त्यामुळे या चार मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यासाठी तातडीने आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. १५ मे रोजी निवडणुकीची आदेश सूचना जाहीर होईल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २२ मेपर्यंत मुदत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी २४ मे रोजी होईल तर दि. २७ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल.
निवडणुकीचे मतदान १० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होईल आणि मतमोजणी १३ जून रोजी होईल. तसेच १८ जून रोजी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.


