बुधवार, दि. २९ मे
पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालाच्या आधारे खासदार राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार नोटीस बजावली जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात म्हटले आहे. या आधारे हे नोटीस बजावली जाणार आहे.
खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात गांधी यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. यात सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयाने दिले होते.
विश्रामबाग पोलिसांनी या संदर्भातील चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला असून यात सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०४ नुसार कार्यवाही केली जात असल्याचे सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी म्हटले आहे.


