सोमवार, दिनांक १० जून २०२४
नरेंद्र मोदी रविवारी देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा सत्तारूढ झाले. सोमवारी त्यांनी आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात केली. पदभार हाती घेत असताना पीएम सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयांतर्गत आता देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होतील.
शेतकरी या निधीची वाट पाहत होते. आचारसंहितेमुळे हा निधी मिळण्यास अडचण निर्माण झाला होता. २०१८ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता पंतप्रधान किसान निधीचा सतरावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून वीस हजार कोटी रुपयांचा निधीसाठी मंजुरी दिल्याने त्याचा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
सध्या पेरणीचे दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांना देखील भेट देण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या निर्णयाला तातडीने मंजुरी दिली आहे. प्रत्येकी दोन हजार अशा तीन समान हप्त्यात या योजनेअंतर्गत वर्षभरात सहा हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
किसान कल्याणसाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. आम्हाला पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.


