शनिवार, दिनांक १५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळविले असताना शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १४) हा प्रवेश सोहळा पार पडला.
हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले जयप्रकाश मुंदडा हे काही काळ माजी सहकार राज्यमंत्री होते. मात्र गेल्या काही वर्षापासून पक्षात डावलले जात असल्याने ते नाराज होते.
लोकसभा निवडणुकीतही पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपलं ऐकून घेतलं नाही. तसेच परस्पर उमेदवार जाहीर केला, अशी नाराजी मुंदडा यांनी पक्ष प्रवेशावेळी बोलून दाखवली.



