गुरुवार, २० जून
लोकसभा निवडणुकीनंतर १२ जुलैला राज्यात ११ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वीच ठाकरे गटाने ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासाठी ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. आशा परिस्थितीत आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आलेला नसताना या निवडणुका घेणं हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन ठाकरे गटाच्या वतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.
काय आहे ठाकरे गटाचे म्हणणं…
आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणं, हे घटनाबाह्य आहे.
याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांची सर्वोच्च न्यायालयात जी प्रतिज्ञापत्रं आहेत, त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत, त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.



